नवी दिल्ली. वृतसंस्था ०६
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु, केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच निवडणूक घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षानंदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र बुद्धिजीवी वर्गानं दिलेल्या इशाऱ्यानं भाजपची चिंता वाढली आहे.
भारतीय जनता पक्षानं जम्मूच्या आर एस पुरामध्ये बुद्धिजिवींची बैठक बोलावली होती. त्यात झालेल्या मंथनानं भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे पक्षाविरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे, असं बुद्धिजिवींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं.काश्मीर खोऱ्यात मोदी लाटेच्या जीवावर पुढे जाऊ नका, असंदेखील बुद्धिजिवींनी सांगितलं. या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही असा बुद्धिजिवींचा अंदाज आहे.त्यांनी दिलेला अहवाल नुकताच दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचला. त्यामुळे भारतीय जनता पक्षासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतादेखील वाढली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये तगडा चेहरा शोधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाकडून सुरू आहे. त्यासाठी भाजप इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेवून आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत भाजपनं मोदी लाटेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकांच्या मनात सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे,’ असं बुद्धिजिवींना त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.
