गावाच्या विकासासाठी इच्छाशक्ती आणि लोकसहभाग महत्त्वाचा – आदर्श सरपंच पेरे-पाटील.
आजरा : प्रतिनिधी.

गावाच्या विकासासाठी प्रबळ इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही गाव आदर्श बनू शकते, असे प्रतिपादन आदर्श सरपंच पेरे-पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी पेरे-पाटील यांनी ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर ग्रामव्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते कर भरण्यासही उत्स्फूर्तपणे पुढे येतात, हे पाटोदा गावाने दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

पाटोदा ग्रामपंचायतीने गावाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजना, ग्रामीण विकासातील महिलांचे योगदान आणि ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी केलेले उपक्रम यांची माहिती त्यांनी दिली. गावातील स्मशानभूमीचे बागेप्रमाणे सुशोभीकरण करून तेथे जांभळाची असंख्य झाडे लावली आहेत. तसेच प्रत्येक गल्लीत हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केली असून, गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून सकारात्मक आणि विधायक काम सुरू ठेवले, तर लोकसहभाग वाढतो आणि गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो. ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन राकेश करमळकर यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भुईंबर, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध गावांतील सरपंच, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
