७० वर्षांचा परंपरागत पशु बाजार पुन्हा सुरू करा:- आजरा व्यापारी मंडळाची नगरपंचायतीकडे आग्रही मागणी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा शहरातील ७० ते ८० वर्षांपासून भरत असलेला पारंपरिक पशु खरेदी-विक्री बाजार कोरोना काळात बंद करण्यात आला होता. कोरोना संपून अनेक वर्षे उलटूनही हा बाजार अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत, याकडे लक्ष वेधत आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाने नगराध्यक्षांना तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. अध्यक्ष
महेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजरा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागासह कोकणातील सावंतवाडी, कुडाळ आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. हा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना दूरच्या बाजारपेठेत जावे लागत आहे.
बाजार सुरू झाल्यास होणारे 9 फायदे मंडळाने पत्रात नमूद केले आहेत:
१) शेतकरी व पशुपालकांना मोठी सोय होईल
२) दुसऱ्या बाजारपेठेत जाण्याचा वेळ व खर्च वाचेल
३) आजरा शहरातील दळणवळण, वाहतूक व्यवस्था कार्यान्वित होईल
४) किराणा, हॉटेल, चहा-नाश्ता, वाहन, पशुखाद्य, कृषी साहित्य व्यवसायाला चालना मिळेल
५) छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना रोजगार मिळेल
६) शहराची व्यापारी व आर्थिक उलाढाल वाढेल
७) जनावरांना योग्य बाजारपेठ मिळेल
८) पारंपारिक व्यापारी महत्त्व पुन्हा वाढेल
९) कोल्हापूर, कोकण आणि कर्नाटक सीमाभागासाठी आजरा पुन्हा महत्त्वाचे पशु व्यापार केंद्र बनेल.
चौकट.
“पारंपरिक बाजार पुन्हा सुरू करा – शेतकऱ्यांना बाजारपेठ द्या, व्यापाराला चालना द्या आणि आजऱ्याच्या अर्थव्यवस्थेला बळ द्या!”
अशी आग्रही मागणी व्यापारी मंडळाने केली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष महेश नार्वेकर, सचिव इंदुलकर, उपाध्यक्ष वाय. जी. इंजल, यांच्यासह संजय हरेर, मनोज कुंभार, रविंद्र केळकर आदी व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.




