बेपत्ता महिला पोलीस हवालदाराचा मृतदेह जंगलात आढळला; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज.
कणकवली, – प्रतिनिधी.
कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने (वय ३६) यांचा मृतदेह बिडवाडी हुंबरने येथील जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
स्मिता माने आणि त्यांचे पती सचिन माने हे दोघेही पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची बदली नुकतीच वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली होती. दोघांनी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी किरकोळ रजा घेतली होती. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी स्मिता यांनी मुलगा सार्थक याला वरवडे येथील खासगी शाळेत सोडले. त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, सचिन माने यांनी शनिवारी (दि. १०) कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर स्मिता यांचा मोबाईल घरीच ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर बिडवाडी हुंबरने येथील जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
स्मिता माने यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या माहेरच्या मंडळींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
