महावितरणवर आजरा शिवसेना उबाठाचा ‘तिरडी मोर्चा’; मागण्यांवर महावितरणचे लेखी उत्तर.
आजरा : प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दि. २१ ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालयावर ‘तिरडी मोर्चा’ काढण्यात आला. स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीजबिले, शेतीपंपांच्या वीजबिलांचा प्रश्न, शॉर्टसर्किटमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच धोकादायक वीजखांब व शेती वीज जोडण्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महावितरणकडे निवेदन देण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्रकाश पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, तसेच डॉ उल्हास त्रिरत्ने, क्राॅ. शांताराम पाटील यांनी महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांना वाढीव बिले, तसेच विद्युत मिटर न सांगता व मागणी नसतांना बदलून ग्राहकांना दिला जातो. असे प्रकार ताबडतोब थांबवावे. ग्राहकांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारीचे समाधानकारक निरसन होऊन त्यांना न्याय द्यावा. याबाबत महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी करून असे प्रकार पुन्हा घडल्यास पुन्हा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरडी मोर्चाला विविध संघटनेचा, आंदोलनाचा पाठिंबा
महावितरणचे लेखी उत्तर.
शिवसेनेच्या निवेदनातील मागण्यांवर महावितरणने २१ ऑगस्ट रोजी लेखी उत्तर दिले आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार केली जात असून, स्मार्ट मीटरबाबत तक्रार असल्यास संबंधित ग्राहकाची तक्रार तपासून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
मीटर रीडिंग, वाढीव अथवा चुकीच्या वीजबिलाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास मीटर क्रमांक, रीडिंग, वापराचा तपशील व बिल आकारणीची नोंद तपासून नियमानुसार दुरुस्ती करण्यात येईल, असेही पत्रात नमूद आहे. जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविल्याबाबत तक्रार असल्यास संबंधित प्रकरणाची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ७.५ एचपी शेतीपंपाच्या वीजबिलाबाबत तक्रारींच्या अनुषंगाने आजरा उपविभागीय कार्यालयात ४ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
शेतीतील विद्युत वाहिनी शॉर्टसर्किट होऊन पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारींबाबत संबंधित प्रस्ताव कोल्हापूर मंडळ कार्यालय तसेच पुढे पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून, मंजुरीनंतर नियमानुसार नुकसानभरपाईची कार्यवाही करण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे.
शेतीसाठी वीज जोडणीच्या प्रलंबित अर्जांबाबतही प्राधान्याने छाननी करण्यात येईल. गावातील धोकादायक वीजखांब बदलण्याच्या मागणीबाबत महावितरणच्या नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या आंदोलनानंतर महावितरणकडून लेखी उत्तर मिळाल्याने आता या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.




