वटपौर्णिमेनिमित्त महिलांची वडाच्या झाडाला सात फेऱ्या. ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो’ साकडे. ( आजरा तालुक्यात उत्साहात वटसावित्री व्रत साजरे; पर्यावरण रक्षणाचाही संदेश. )
आजरा, प्रतिनिधी
ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेनिमित्त आजरा शहरासह तालुक्यात संपूर्ण विवाहित महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटसावित्री व्रत उत्साहात साजरे केले. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून सात फेऱ्या घातल्या.
आज दि २९ सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ, मारुती मंदिर परिसर, तसेच गावोगावच्या वडाच्या झाडाखाली महिलांची गर्दी दिसून आली. नटून-थटून आलेल्या महिलांनी हळद-कुंकू, फुले, आंबे, जांभळे, केळी यांसह ओटीचे साहित्य वाहून वडाची पूजा केली. वडाच्या खोडाला सुती दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालताना “जन्मोजन्मी हाच पती मिळो, सौभाग्य अखंड राहो” अशी प्रार्थना केली.
💥पौराणिक संदर्भ.
महाभारतातील कथेनुसार, सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या बळावर व बुद्धिचातुर्याने यमराजाकडून आपला पती सत्यवान याचे प्राण परत मिळवले होते. तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमा होता. यमाशी संवाद करताना सावित्री ज्या वटवृक्षाखाली बसली होती, त्याची पूजा करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली. वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा वास असतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
💥आधुनिक विचारांची जोड.
पूर्वी फक्त ‘जन्मोजन्मी हाच पती’ ही प्रार्थना केली जायची. मात्र आता अनेक सुशिक्षित महिला ‘पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास, आरोग्य व समजूतदारपणा नांदो’ अशी प्रार्थना करताना दिसल्या. काही ठिकाणी महिला मंडळांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वडाच्या रोपांचे वाटपही केले.
“वडाचे झाड २४ तास ऑक्सिजन देते. ते दीर्घायुषी आहे. सावित्रीप्रमाणे तेही संकटकाळी आधार देते. त्यामुळे वड पूजनाबरोबरच त्याचे संवर्धन करणेही महत्वाचे आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या मडिलगे ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केले.
या निमित्ताने आठवडा बाजारपेठेच्या नजीक असलेल्या वडाच्या वटवृक्षाला पूजेच्या साहित्याला, फळांना व बांगड्यांना विशेष मागणी होती. दिवसभर वडाच्या झाडांभोवती भक्तीमय वातावरण होते.
या श्रद्धामय कार्यक्रमात. सौ. संगीता सुतार, कोमल कातकर, मंगल घाटगे, निशा कातकर, सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




