आजरा – रामतीर्थ पर्यटन कर आकारणीवर अन्याय निवारण समितीचा आवाज बुलंद – सुविधा नाही तर कर वसुली कशासाठी
आजरा (प्रतिनिधी)
रामतीर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाकडून करण्यात येणारी तथाकथित पर्यटन कर आकारणी अन्यायकारक असल्याचा ठपका आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तसेच आजरा शहर प्रतिनिधींनी ठेवला आहे. याबाबत समितीने नुकतीच भेट देऊन तीव्र आक्षेप नोंदवला.
रामतीर्थ पर्यटन कर नाक्यावर झालेल्या या भेटीदरम्यान समितीकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला यामध्ये –
१.) पर्यटकांकडून कर आकारणी केली जाते, परंतु त्यांच्या सोयीसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही., २.) वसूल केलेल्या कराची पावती अधिकृत शिक्का व सहीशिवाय देण्यात येते, यामुळे व्यवहाराबाबत शंका निर्माण होते., ३.) पर्यटकांनी विचारणा केल्यास समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे वादावादीचे प्रसंग घडतात.
४. समितीच्या मागणीनुसार –
आजरा तालुक्यातील सर्व पर्यटकांना या अन्यायकारक कर आकारणीमधून सूट देण्यात यावी. दुचाकी वाहनधारकांकडून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ नये.
या संदर्भात जिल्हा वन अधिकारी यांच्या उपस्थितीत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व आजरा शहर प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात यावा. या भेटीदरम्यान अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, यशवंत चव्हाण, दिनकर जाधव, जोतिबा, जावेद पठाण, मिलिन डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते.
या आंदोलनामुळे रामतीर्थ पर्यटन कर आकारणीचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला असून जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
