रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी लवकरच व्हाट्सअप क्रमांक.- प्रताप सरनाईक यांची घोषणा.
सावंतवाडी मोती तलावात विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
11 हजार व्होल्टच्या धक्क्याने तरुण जागीच ठार.- जमिनीपासून 35 फुटावर मृतदेह राहिला लोंबकळत. (चुकून फीडर बंद केला अन्..)
ठाकरे कुटुंबाला दहशतीत आणण्यासाठी राजकीय षडयंत्र ( माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी उघड केला मोठा गौप्यस्फोट!)
मुंबई :- प्रतिनिधी
प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा – टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात, गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. तसेच प्रादेशिक विभागनिहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप क्रमांकावर करतील. तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
सावंतवाडी मोती तलावात विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
धाडस दाखवित सावंतवाडीतील दीपेश शिंदे आणि इव्हिनिंग वॉक करणारे आंबोली येथील सैनिक एकनाथ गावडे यांनी या दोघांनी वाचविले विद्यार्थिनीचे प्राण
सावंतवाडी :- प्रतिनिधी

सावंतवाडी मोती तलावात एका विद्यार्थिनीने उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोरील मोती तलावाकाठी घडली. सुदैवाने दुचाकीवरून जाणाऱ्या सावंतवाडीतील दीपेश शिंदे आणि इव्हिनिंग वॉक करणारे आंबोली येथील सैनिक एकनाथ गावडे यांनी धाडस दाखवत तलावात उडी टाकून विद्यार्थिनीला जीवदान दिले. तिची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर भुमिका शेडगे असे तिचे नाव आहे. शिरोडा नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेली भुमिका शेडगे ही एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे.आज ५ च्या सुमारास तिने तलावात उडी टाकल्याचे नागरिकांनी पाहताच दोरी टाकून तिला दोरी पकडायला सांगितली. त्याचवेळी दीपेश शिंदे आणि एकनाथ गावडे यांनी धाव घेत तलावात उडी टाकून तिचे प्राण वाचवले. त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. रुग्णालयात तिचे आई – वडील, नातेवाईक तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सदर विद्यार्थिनी सावंतवाडीतील रहिवासी आहे.
11 हजार व्होल्टच्या धक्क्याने तरुण जागीच ठार.- जमिनीपासून 35 फुटावर मृतदेह राहिला लोंबकळत. (चुकून फीडर बंद केला अन्..)
सोलापूर :- प्रतिनिधी.

विद्युत फीडर बंद करताना लाइनमनकडून चूक झाली.डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाटगे (वय २७) या तरुणाला ११ हजार व्होल्ट विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जमिनीपासून ३५ फुटावर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला. तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला. शुक्रवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी – मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली. पाच वर्षात एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली. संगदरी व मुस्ती या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी राचप्पा नागप्पा बचुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी (ट्रान्सफॉर्मर) आहेत. दीड महिन्यापूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदरी गावच्या फीडरवर घेतले होते.ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही. त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले. आणि संगदरीच्या फीडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले. परिणामी दुर्घटना घडली. कुमार याला महावितरणच्या कामाचा काहीसा अनुभव होता. तिघे भाऊ असलेल्या घाटगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा. तो अविवाहित होता. आपल्या गावाची लाइट कशी काय नाही, गावच्या डीपीत काय बिघाड झालाय, हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता. त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते. त्या डीपीवरून वीजपुरवठा सुरू होता, वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले.
लाइनमनवर गुन्हा
डीपीवर चढल्यावर वीजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, याची माहिती असताना देखील जमादार याने कुमार घाडगेला डीपीवर चढविले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादारविरुद्ध वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.
मुस्तीत ५ वर्षात दुसऱ्यांदा प्रकार..
मुस्ती या गावात १५ ऑगस्ट २०२१ रोजी लक्ष्मीकांत तोरकडे (वय २१) या तरुणाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी डीपीवर चढल्यावर अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वीजेचा शॉक लागल्याने तोही असाच डीपीवर लटकला होता.
ठाकरे कुटुंबाला दहशतीत आणण्यासाठी राजकीय षडयंत्र ( माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी उघड केला मोठा गौप्यस्फोट!)
अहिल्यानगर :- प्रतिनिधी.
दिशा सालियान प्रकरणातून राजकारणाचा स्तर किती खालावला आहे, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.ठाकरे कुटुंबाला दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकरण वारंवार उकरून काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी (२१ मार्च २०२५) अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उपस्थित होते.थोरात म्हणाले, “राजकारणात मतभेद असू शकतात, पण ते तत्त्वावर आधारित असावेत. एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण गेले, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.दिशा सालियान प्रकरण हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ठाकरे कुटुंबावर दहशत निर्माण करण्यासाठीच हे प्रकरण पुन्हा पुन्हा समोर आणले जात आहे.” त्यांनी या प्रकरणाच्या राजकीयी वापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरात यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “जगातील अनेक देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, पण आपल्या देशात दंगली आणि तणाव निर्माण होत आहे हे दुर्दैवी आहे.समाजात शांतता आणि आनंद राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात दंगली होत असल्याचे अभिमानाने सांगणार आहात का? अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म सरकारने पाळला पाहिजे.” त्यांनी सरकारला शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला दिला. गुन्हेगारीच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले, “गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्याची जात, धर्म पाहिला जाऊ नये. गुन्हेगाराची एकच जात असते, ती म्हणजे गुन्हेगारी. त्यामुळे त्याला शिक्षा देण्यात भेदभाव होता कामा नये. राज्यात शांतता निर्माण करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.