आजऱ्यात सार्वजनिक विहिरींवर खाजगी मोटारींचे अतिक्रमण, दुर्घटनेची भीती.- अगोदर मोटार कोणाची.. तुझी – काय माझी स्पर्धा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरातील सार्वजनिक विहिरींवर खाजगी मोटारी बसवण्याचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे. मोटारींसोबतच विद्युत वायरी थेट पाण्यात सोडल्या जात असल्याने जीवितहानीची शक्यता निर्माण झाली असून, ‘दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल शहरवासीय विचारत आहेत.
अनेक सार्वजनिक विहिरींवर पाच ते दहा खाजगी मोटारी बसवलेल्या आहेत. त्यांच्या वायरिंगचे जाळे विहिरीभोवती व पाण्यात पसरले आहे. बहुतांश वायरींना टेप लावलेली नसून त्या उघड्या आहेत. पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरतात. याच काळात लहान मुले विहिरीकाठी खेळत असतात. पाण्यात करंट उतरल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. विहिरीच्या कठड्याला छिद्रे पाडून पाईपलाईन नेल्या जातात. त्यामुळे ऐतिहासिक विहिरींची दुरवस्था होत आहे.
एकाच विहिरीतून १० ते १५ मोटारींद्वारे बेसुमार उपसा सुरू आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी झपाट्याने कमी होत असून पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पूर्वी हंड्याने पाणी भरणाऱ्या महिलांना आता विहिरीजवळ जागाच मिळत नाही. मोटारी व पाईपच्या जाळ्यामुळे सामान्य माणूस पाण्यापासून वंचित राहत आहे.
💥 अगोदर मोटार कोणाची.- ‘माझी मोटार आधी, तुझी नंतर’ यावरून विहिरींवर रोज वाद होत आहेत.
खाजगी मोटार धारक फक्त पाणी उपसा करतात. विहीर स्वच्छ करणे, गाळ काढणे याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे विहिरी गटार बनत चालल्या आहेत.
नियमानुसार सार्वजनिक विहिरीवर खाजगी मोटार बसवता येत नाही. तरीही शहरातील १२ पैकी ८ विहिरींवर अतिक्रमण झाले आहे. “नगरपंचायतीने वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
नगरपंचायतीने सर्व खाजगी मोटारी जप्त करून विहिरी मोकळ्या कराव्यात. आडव्या तिडव्या पद्धतीने केलेल्या विद्युत जोडण्या निश्चितच धोकादायक आहेत. काहींनी तर रस्ते खोदून विज जोडण्या घेतलेल्या आहेत. उंदीर भुशी यामुळे वायरी कुरतडून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
