🟥सात वर्षांनी बाळ झालं.- आईच्या हातातून निसटून २१ व्या मजल्यावरुन खाली पडलं.
(चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ )
🛑भारताच्या बीएसएफ जवानाने चुकून पाकिस्तानची सीमा ओलांडली.- पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात.
🟥दोन पर्यटक दाखल तर आठजण प्रवासात.- सर्व पर्यटक सुखरुप.- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
🛑महाराष्ट्रातील ५०० पर्यटक मायभूमीत सुखरूप परतले.
🛑मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी.- बिरदेव डोणेचे प्रेरणादायी यश.- अधिकारी होण्याचे स्वप्न साकार.
🟥सात वर्षांनी बाळ झालं.- आईच्या हातातून निसटून २१ व्या मजल्यावरुन खाली पडलं.
(चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ )
विरार :- प्रतिनिधी.
सात महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला सुरुवात केली होती, त्याचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना विरार परिसरात घडली आहे. आईच्या हातातून निसटून हे बाळ खाली पडल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खिडकी बंद करत असताना आईचा तोल गेला आणि तिच्या कडेवरील सात महिन्यांचे बाळ एकवीसाव्या मजल्यावरून खाली पडलं. यात त्या सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विरारच्या बोळींज परिसरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🟥विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीमधील २१ व्या मजल्यावर राहत होते. त्यांना सात महिन्यांचा मुलगा व्रिशांक आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याला सात वर्षांनंतर बाळ झाले होते. पती विकी सदाने नेहमीप्रमाणे कामावर गेले होते व बाळाला बघण्यासाठी घरात त्यांचे काही नातेवाईक आले होते. पूजा सदाने यांनी त्यांच्या बाळाला कडेवर घेतले होते. याचदरम्यान बाळाला खांद्यावर घेऊन त्या खोलीतील खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. खिडकीजवळ लादीवर पाणी असल्याने त्यांचा पाय घसरला. पाण्यावर पाय घसरून तोल गेल्यामुळे पूजा सदाने यांच्या कडेवर असलेले त्यांचे सात महिन्यांचे बाळ २१ व्या मजल्यावरील त्यांच्या खोलीच्या खिडकीतून खाली पडले. बुधवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. व्रिशांकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इमारतीच्या एकवीसाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
खिडकी बंद करताना कडेवरील बाळ खाली पडले, ज्या खिडकीतून बाळ खाली पडले त्या खिडकीला पूर्ण जाळी नसल्याची माहिती बोळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. दरम्यान, सात महिन्याच्या बाळाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सदाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर पालकांनी लहान मुलांची काळजी घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अनेकदा उंच इमारतींच्या सोसायटींमध्ये इमारतीच्या खिडकीला ग्रील लावलेले नसते, किंवा गॅलरी, खिडक्या ओपन असल्यानेही जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, घरात लहान मुले असताना पालकांनी ही खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे.
🟥भारताच्या बीएसएफ जवानाने चुकून पाकिस्तानची सीमा ओलांडली.- पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
देशात एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एका बीएसएफ जवानाने सीमारेषा ओलांडली आहे. बॉर्डर ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना असल्याचे समजते. सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. त्यापैकी, एका जवानाने सीमारेषा पार केल्याने तो पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेला आहे. पूनम कुमार असं त्याचं नाव आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी फ्लॅट बैठका घेण्यात येत आहेत.
भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा एक जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. या भारतीय जवानास पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं आहे. हा जवान सीमारेषेवरील कुंपणाच्या हद्दीत नो मॅन्स लँडवरील पीकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निगराणीचे काम करत होता. मात्र, चुकीने तो पाकिस्तानी सीमा हद्दीत गेल्याने आता वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे. झिरो लाईनच्या अगोदर या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करण्यास मुभा दिली जाते. त्यामुळे, पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावली नाही.

त्यामुळे झिरो लाईन पार करुन बीएसएफ जवान ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसण्यास गेला होता. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफ जवानाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
🟥दोन पर्यटक दाखल तर आठजण प्रवासात.- सर्व पर्यटक सुखरुप.- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 61 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. त्यापैकी 2 प्रवासी आज दाखल झाले आहेत. प्रयास टुरिझमने काश्मीर येथे गेलेले 8 प्रवासी हे आज विमानाने मुंबईला येत असून, उद्या दि. 25 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत रत्नागिरीमध्ये दाखल होतील. यात चिपळूणमधील सातजणांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
अमृता ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले 6 प्रवासी हे दि. 25 एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत. तसेच श्री टुरिझमने काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले 34 प्रवासी दि. 26 एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहचणार आहेत. तसेच खेडशी येथील 6, गयाळवाडी येथील 3 आणि डफळवाडी येथील 2 असे एकूण 11 प्रवासी दि. 28 एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहचणार आहेत.

🟥जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांना संपर्क झाला असून,ते सर्वजण सुखरुप आणि सुरक्षित आहेत .
🛑दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसात आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक मायभूमीत सुखरूप परतले.
उर्वरीत २३२ प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाचे उड्डाण
मुंबई :- प्रतिनिधी.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काश्मीर खोऱ्यात अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली असून त्यातूनही पर्यटक मायभूमीत परतले आहेत.
एकाच छताखाली देशातील राज्यातील घडामोडी
पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत मदत केली.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत.
दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 6 प्रवासी मृत्युमुखी पडले असून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. त्यानंतर, अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
🛑मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी.- बिरदेव डोणेचे प्रेरणादायी यश.- अधिकारी होण्याचे स्वप्न साकार
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून, पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळ…खाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. तो ही परीक्षा पास झालेला निकाल ऐकण्यासाठी सुद्धा गावी नव्हता.
2024 मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 551 रँकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (मंगळवारी) दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल समजताच कागल तालुक्यातील यमगे येथे त्याच्या गावी मित्र परिवाराने जल्लोष केला.
🟥मात्र, बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावात आपल्या मामांच्या मेंढ्यासह आपल्या मेंढ्या एकत्रित करून मेंढ्याची राखण करत होता. मेंढ्यांची केस पावसाळ्याच्या अगोदर कटिंग केली जातात. केस कटिंग करत असताना त्याला फोन आला. ‘बिरुदेव, तू यूपीएससीची परीक्षा पास झालास…’ हे ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, निकाल गावात बिरूदेव रानात अशी स्थिती झाली. बिरुदेव हे कागल तालुक्यातील यमगे गावचे सुपुत्र आहेत. इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता. पण त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल, टीव्ही व खेळ यापासून अलिप्त राहत जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले. बिरदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता.
त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात सर्वप्रथम आला होता. गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु केला . या ठिकाणी त्याने दिवसातून 22 तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. दिल्लीत आयएएस क्लासेसमध्ये परीक्षेसंबधी मार्गदर्शन घेतले. त्यानंतर जोरदार अभ्यासाची तयारी केली. दिल्लीत अभ्यास पूर्ण करून परीक्षा दिली. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने यश संपादन केले आहे.